छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पोलिस ठाण्यात मोबाइल हरवल्याच्या तक्रारीसाठी आलेल्या तरुणीला एका पोलिस उपनिरीक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. जातीवाचक शिवीगाळ करून तीनदा गर्भपात केला. उपनिरीक्षकाच्या पत्नी व मुलानेदेखील मारहाण केली. यातही तिचा गर्भतपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत क्रांती चौक पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक सुभाष चव्हाण (वय ५८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये तरुणी मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख आरोपी उपनिरीक्षक चव्हाण याच्याशी झाली. त्याने नंबर कन्फर्म करण्यासाठी कॉल केल्याची थाप मारली. त्यानंतर तो सतत मोबाइलवर संवाद साधत होता. पुढे याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ’तुझी जबाबदारी घेईन, तुझ्याशीच लग्न करेन’, असे आश्वासन दिले. यानंतर विविध ठिकाणी लॉजवर नेऊन तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. काही काळानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला. ’तू खालच्या जातीची आहेस’, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ’मी पोलिस आहे, तू माझे काही बिघडवू शकणार नाही’, अशी धमकी देत खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. शेवटी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.













